वडीगोद्री ( जालना ): सध्या सोशल मीडियावर माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते राजेश टोपे हे भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर धरलेला आहे. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत टोपे यांनी आज यासंबंधी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, “मी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत जे काही मेसेज किंवा अफवा सोशल मीडियावर फिरत आहेत, त्या सर्व निराधार, खोट्या आणि निव्वळ अफवा आहेत. मी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला भेटलेलो देखील नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) सोडणार नाही. गेली अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून मी काम करत आहे आणि यापुढेही तेच काम मनापासून करत राहणार आहे,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
टोपे हे मराठवाड्यातील प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षाचे महत्वाचे नेतृत्व म्हणून परिचित आहेत. त्यांच्या भाजपात जाण्याच्या शक्यतेवरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, त्यांनी वेळेवर खुलासा करत त्या चर्चांवर पूर्णविराम दिला आहे. टोपे यांनी यापूर्वीही अनेक वेळा पक्षनिष्ठा कायम ठेवत आपली निष्ठा शरद पवार यांच्याप्रती असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्या या स्पष्ट वक्तव्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 05-08-2025














