खेडमध्ये भरधाव डंपरची एसटी बसला धडक; दोन प्रवासी जखमी, आरोपी फरार

खेड: तालुक्यातील बहिरवली फाट्याजवळ सोमवारी (४ ऑगस्ट २०२५) दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात येणाऱ्या एका डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील दोन प्रवासी जखमी झाले असून, डंपरचालक घटनास्थळावरून पळून गेला. एसटी बसचालकाच्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताचा तपशील

खेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी रमेश योगाजी कामेटे (वय ४४) हे एम.एच.२०-बी.एल-२५८० क्रमांकाची एसटी बस खेडहून दापोलीकडे घेऊन जात होते. दुपारी १२.१५ च्या सुमारास बस बहिरवली फाट्याजवळ पोहोचली असता, समोरून दापोलीहून खेडच्या दिशेने येणाऱ्या एका पांढऱ्या-लाल रंगाच्या डंपरने रस्त्याची स्थिती लक्षात न घेता, अतिवेगाने आणि हलगर्जीपणे बसच्या चालकाच्या बाजूला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बसचे मोठे नुकसान झाले.

जखमी आणि आरोपीचा पाठलाग

अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. एसटी बसचालक रमेश कामेटे यांनी एका दुचाकीच्या मदतीने डंपरचा पाठलाग केला. पाठलाग करताना डंपरचालकाने आपले वाहन तिसवाडी रोडवर पळवले. कामेटे यांनी पुढे जाऊन डंपर अडवला. त्यावेळी डंपरचा क्रमांक एम.एच.०८-डब्लू-८२०५ असल्याचे दिसून आले. या अपघातात बसमधील संकेत सुभाष जगताप (वय २६) आणि सोनाली संकेत जगताप (वय २४) हे पती-पत्नी जखमी झाले आहेत.

गुन्हा दाखल

या घटनेनंतर खेड पोलीस ठाण्यात डंपरचालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५(अ) सह मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४(अ), (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार डंपरचालकाचा शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:36 05-08-2025