रत्नागिरी : केंद्र शासनाच्या विविध अभियानांतर्गत दि. ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘अंगदान जीवन संजीवनी अभियान’ रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला.
या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांनी उपस्थितांना अवयव दानाची गरज आणि प्रक्रिया याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ब्रेन डेड रुग्णांमधून हृदय, यकृत, स्वादुपिंड, किडनी आणि डोळे असे अवयव दान होऊन ८ जणांचे प्राण वाचवता येऊ शकतात.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या नेत्र संकलन केंद्र कार्यरत असून, गेल्या वर्षभरात १० व्यक्तींच्या नातेवाईकांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे. यावेळी डॉ. भास्कर जगताप यांनी नागरिकांना आवाहन केले की, जास्तीत जास्त नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा.
ब्रेन डेड झाल्यानंतर, विभागनिहाय मंडळाद्वारे शहानिशा करून प्रमाणपत्र देण्यात येते, त्यानंतरच अवयवदानाची प्रक्रिया होते. रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारचे एक यशस्वी अवयवदान कोल्हापूर विभागीय मंडळाच्या परवानगीनंतर पार पडले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिलेली माहिती:
जिल्हा अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी श्री. संदीप उगवेकर यांनी नेत्रदानाची प्रक्रिया स्पष्ट केली.
नेत्रदान समुपदेशक श्री. राम चिंचाळे यांनी उपस्थितांकडून अवयवदान प्रतिज्ञा घेतली.
नेत्र विभाग प्रमुख डॉ. वनिता कानगुले यांनी अपील केले की, बुब्बूळ प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांनी जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी किंवा मेडिकल कॉलेज, डेरवण येथे नावनोंदणी करावी.
या कार्यक्रमात NCD वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव कांबळे, डॉ. आठले मॅडम, डॉ. गावंडे, डॉ. यश प्रसादे, मेट्रन जयश्री शिरधनकर, सिस्टर रसिका सावंत, आंबेकर सिस्टर, सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे, समुपदेशक प्रवीण भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘आपल्या एका निर्णयामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. अवयव व नेत्रदान हे मानवतेचे सर्वोच्च प्रतीक आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजात जागृती निर्माण करावी व या पवित्र कार्यात सहभागी व्हावे.’ – डॉ. भास्कर जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 05-08-2025














