रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष हिराभाई बुटाला यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खेडमधील सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराचंद परशुराम ऊर्फ हिराभाई बुटाला (वय ८१) यांचे मंगळवारी (दि. ५ ऑगस्ट) अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले.

हिराभाईंनी खेडमध्ये किराणा मालाचे व्यापारी म्हणून व्यवसाय सुरू केला. राजकारणात सक्रिय झाल्यावर आधी ते खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष होते. नंतर १९८५ ते १९९० या काळात त्यांनी कॉंग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपद भूषवले. त्यांना प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पुरस्काराने नवी दिल्लीत गौरवण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, भाईसाहेब सावंत, माजी कायदामंत्री हुसेन दलवाई, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी आदी अनेक दिग्गज नेतेमंडळींशी त्यांचे जवळचे संबंध होते.

खेडमधील सहजीवन शिक्षण संस्थेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. १९७३पासून आतापर्यंत सलग ५२ वर्षे त्यांनी त्या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. खेड तालुक्यातील अनेक सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संस्थांशी ते निगडित होते. हिराभाईंच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार आहे. नवी मुंबईतील रेवमॅक्स कंपनीचे मालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे स्नेही कौस्तुभ बुटाला यांचे ते वडील होत.

हिराभाईंच्या निधनामुळे सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, आयसीएस महाविद्यालय, हिराचंद परशुराम बुटाला माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, सहजीवन प्रायमरी स्कूल या संस्थांमध्ये आज हिराभाईंना श्रद्धांजली वाहून कामकाज बंद ठेवण्यात आले. एच. पी. बुटाला किराणा दुकान, एच. पी. बुटाला अँड सर्व्हिसेस, लक्ष्मी मसाले इंडस्ट्रीज, एचपी गॅस सर्व्हिस या त्यांच्या आस्थापनाही बंद ठेवण्यात आल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 06-08-2025