मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि आसपासच्या भागांत पावसाने उसंत घेतली असली, तरी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचे ढग दाटून येत आहेत.
राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांच्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम तर काही ठिकाणी गडगडाटी पावसाची शक्यता आहे. कोकण-गोव्यातील अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे.
समुद्रातील स्थितीचा परिणाम
सध्या तामिळनाडूच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असून, अरबी समुद्रात पूर्व-पश्चिम दिशा असलेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात हवामान बदलताना दिसत आहे.
मुंबईत मात्र पावसाने विश्रांती
मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये गेल्या २४ तासांपासून पावसाने उसंत घेतली असून, अंशतः ढगाळ वातावरण आहे. मात्र, पावसाची सक्रियता लक्षणीयरीत्या कमी झालेली आहे.
पुढील चार दिवसांसाठी पावसाचा इशारा
हवामान विभागाने ५ ते ८ ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून, पावसाचा ट्रेंड पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकणार आहे.
पुढील ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे .
५ ऑगस्ट – यलो अलर्ट: -विदर्भ: नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली – मराठवाडा: नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी- दक्षिण महाराष्ट्र: सोलापूर, सांगली
६ ऑगस्ट:-विदर्भ: वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली-मराठवाडा: बीड, परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव- दक्षिण महाराष्ट्र: सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
७ ऑगस्ट:- कोकण व पश्चिम महाराष्ट्र: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
मराठवाडा व विदर्भ: अहिल्यानगर (नगर), सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
८ ऑगस्ट:- कोकण व पश्चिम महाराष्ट्र: रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर
मराठवाडा व विदर्भ: सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
राज्यात उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांसाठी ही पावसाची चाहूल दिलासा देणारी आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याने, शेतकरी वर्गालाही याचा फायदा होऊ शकतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 06-08-2025














