साखरपा : मिऱ्या- नागपूर महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर त्याचा फटका सलग दुसऱ्या वर्षी एसटी प्रवाशांना बसत आहे. ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागली होती. आता पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी निवाराशेडवर ग्रामस्थांनीच प्लास्टिकचे छप्पर घातले. ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांनी स्वतःहून दुरुस्ती केली आहे.
महामार्गावर दाभोळे ते साखरपादरम्यान एसटीच्या थांब्यावर निवाराशेडची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. पावसातच उभे राहून प्रवाशांना एसटीची वाट पाहावी लागत आहे. या परिसरात काही ठिकाणी एसटी निवाराशेड उभारण्यासाठी लोखंडी सांगाडे उभारण्यात आले आहेत. ते सांगाडे उभारूनही आता पाच महिने झाले. पाली ते देवळे फाटादरम्यान निवाराशेडचे बांधकाम पूर्ण झाले असून, तिथे प्रवाशांची चांगली सोय होत आहे; पण दाभोळे ते साखरपादरम्यान असलेल्या शेड मात्र अर्धवट अवस्थेत आहेत. त्यांच्यावर ना छप्पर आहे, ना बाजूने आडोसा. त्यामुळे अशा शेडखाली प्रवाशांना छत्री उघडूनच एसटीची वाट पाहावी लागते. कोंडगाव येथे उभारण्यात आलेल्या एका सांगाड्यावर अखेर ग्रामस्थांनीच प्लास्टिकचा कागद टाकून तात्पुरता आडोसा तयार केला आहे.
सुविधांकडे दुर्लक्ष
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे साखरपापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. देवळे घाट वगळता पाली ते साखरपादरम्यान किमान एका बाजूचा महामार्ग पूर्ण झाला आहे; परंतु या मार्गावर प्रवाशांना आवश्यक सुविधा देण्याकडे ठेकेदारासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 06/Aug/2025














