चिपळूण : येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे बांधकाम रखडले असून, उर्वरित कामासाठी तिसऱ्या नव्या ठेकेदाराची नियुक्ती एसटी महामंडळाने केली आहे. त्या बसस्थानकाच्या एका इमारतीसाठी आतापर्यंत दोन ठेकेदार बदलण्यात आले आहेत. नव्या ठेकेदाराला उर्वरित कामाची वर्कऑर्डर काही दिवसांपूर्वीच देण्यात आली असली तरीही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही; मात्र गणपतीनंतर या कामाला सुरुवात होईल, अशी शक्यता आहे.
जीर्ण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत तोडून त्या जागी नव्याने सोयी-सुविधांनीयुक्त ‘हायटेक’ बसस्थानक उभारण्यास काही वर्षांपूर्वी सुरुवात झाली. काही दिवसांनंतर बसस्थानकाच्या बांधकामाचा बट्ट्याबोळ उडाला. ठेकेदाराच्या कामाकडे एसटी महामंडळाने केलेल्या दुर्लक्षामुळे काम रखडले. बसस्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी एसटी महामंडळाने पूर्वीच्या ठेकेदाराचा ठेका रद्द केला आहे. त्या जागी नवा ठेकेदार नियुक्त केला आहे. त्या ठेकेदाराने रखडलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी इमारतीचा पाया बांधण्याचे काम सुरू केले. त्या पाठोपाठ इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅबही पूर्ण केला. गेले काही महिने रखडलेली कामे पूर्ण होत असल्यामुळे प्रवासी समाधानी होते; मात्र त्याचवेळी ठेकेदाराने काम थांबवले.
२ कोटी ८७ लाखांचे हे काम करण्यासाठी चिपळूणमधील एका ठेकेदाराची निवड केली आहे. त्या कामाची वर्कऑर्डरही देण्यात आली. आता तिसरा ठेकेदार तरी बसस्थानक इमारतीचे काम पूर्ण करेल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून वर्तवली जात आहे.
एसटी बसस्थानकाचे काम लवकर होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गणपतीनंतर काम सुरू करण्याची सूचना ठेकेदाराला केली आहे- दीपक चव्हाण, आगारप्रमुख, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 06/Aug/2025














