राजापूर : शहरातील श्री विठ्ठल मंदिरामध्ये शक्तीतुरा जाखडी नृत्याचा जंगी सामना रंगला. ढोलकीच्या तालावर आकर्षक वेशभूषेत फेर धरत नृत्य करणारी मुले आणि सुमधूर आवाजामध्ये शाहिरांनी गायलेल्या विविधांगी गाण्यांनी श्री विठ्ठल मंदिरासह बाजारपेठ परिसर दुमदुमून गेला. आमदार किरण सामंत पुरस्कृत आणि अनादीसिद्ध शक्तीतुरा शाहीर समाजसंघ, राजापूर प्रतिष्ठान, रवीदादा सहयोगी मित्रमंडळ आणि युवा विकास किसान प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला अनादीसिद्ध शक्तीतुरा शाहीर समाजसंघाचे संस्थापक विश्वनाथ गोसावी, रवींद्र नागरेकर, संदीप मालपेकर, संतोष हातणकर, कृष्णा नागरेकर, दिनेश सोडये, सुरेश बाईत, मोहन पाडावे, दीपक बेंद्रे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.
या प्रसंगी शक्तीवाले शाहीर दिनेश सनगले (संगमेश्वर) आणि तुरेवाले शाहीर नितीन गोसावी (राजापूर) यांनी दर्जेदार गाणी गायली तसेच श्रावण सोमवारनिमित्त रंगलेल्या जाखडीच्या डबलबारीचा मनमुरादपणे आनंद लुटला.
या प्रसंगी प्रास्ताविकात संयोजक नागरेकर यांनी वाडीवाडीत असलेले जाखडी कार्यक्रम आता दुर्मिळ होत चालले आहेत. या कलेला व्यासपीठ मिळावे आणि पूर्वी विष्ठ्ठल मंदिरात दर श्रावणी सोमवारी होणारे कार्यक्रमाची परंपरा पुन्हा सुरू व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन पाडावे यांनी केले. शक्तीवाले शाहीर सनगले विरूद्ध तुरेवाले शाहीर गोसावी या दोन्ही शाहिरांनी पारंपरिक नृत्याविष्कार सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
कोकणी लोककलांचे जतन करा
लोककला समाज प्रबोधनाचे उत्तम साधन असून, लोप पावत असलेल्या कोकणी लोककलांचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. कलावंतांनी या लोककलांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले पाहिजे, असे शाहीर विश्वनाथ गोसावी यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 06/Aug/2025














