गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाकडून तिहेरी सन्मान!

रत्नागिरी : नुकत्याच पार पडलेल्या ५७ व्या आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या स्पर्धेत महाविद्यालय, येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाचा तिहेरी सन्मान केला.
मनस्वी जाधवचा आंतरराष्ट्रीय गौरव
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी मनस्वी जाधव हिने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. लोककला सादरीकरणासाठी तिची निवड भारतीय संघात करण्यात आली होती, ज्या संघाने इटली येथे झालेल्या लोक महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व केले. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल मनस्वीला सुवर्णपदकाने गौरवण्यात आले.
डॉ. आनंद आंबेकर यांचा सन्मान
महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि मुंबई विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कमिटी तसेच जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत असणारे डॉ. आनंद आंबेकर यांनाही त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. गेल्या १८ वर्षांपासून ते महाविद्यालय, रत्नागिरी जिल्हा आणि विद्यापीठासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या भरीव कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांचा विशेष सन्मान केला.
चॅम्पियनशिप करंडकावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे नाव
५७ व्या युवा महोत्सवामध्ये जिल्हास्तरीय १७ महाविद्यालयांमध्ये झालेल्या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने सर्वाधिक गुण मिळवत चॅम्पियनशिप करंडक पटकावला. नाट्य, नृत्य, संगीत, वाङ्मय आणि हस्तकला यांसारख्या विविध कला प्रकारांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल मुंबई विद्यापीठाने त्यांना सन्मानित केले.
या तिहेरी यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दूदगीकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि इतर सर्व उपप्राचार्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनस्वी जाधव, डॉ. आनंद आंबेकर आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमाला प्रा. वेदांग सौंदलगेकर यांचीही उपस्थिती होती.