सावर्डे : मुसळधार पाऊस कोसळण्याच्या नक्षत्रातच पावसाने दडी मारल्यानंतर गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे भात, भाजीपाला तसेच फळझाडांच्या वाढीसाठी आवश्यक पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कोरडवाहू भागात चिंतेत असलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. सध्या शेतकरीवर्ग भातापिकांना रासायनिक खतांचा डोस देण्यात व्यस्त आहे.
जिल्ह्यात मे महिन्यात जोरदार पाऊस झाला. जून महिन्यात पावसाचा जोर अनियमित होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे भातपेरणी व लावणीचे वेळापत्रक कोलमडले, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी चिखलातच पेरणी उरकली काही ठिकाणी रोपांची योग्य उगवण आणि वाढ झालेली नाही. त्याचा परिणाम रोपांच्या लावणीवर झाला. १ ते ३१ जुलै या महिन्याभरात जिल्ह्यात १ हजार २९३ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात २१०१ मिमी सरासरी नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३००१ मिमी सरासरी पाऊस झाला होता. सुमारे ९०० मिमी सरासरी कमी पाऊस झाला आहे.
त्याचे परिणाम भातशेतीवर दिसत आहेत लागवड केलेल्या रोपांची वाढ व्यवस्थित होईल की, नाही अशी स्थिती सर्वत्र दिसत होती. जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडयात पाऊस अनियमित होता. दिवसातून एखादी सर पडून जात होती. दुपारी कडकडीत ऊन पडत होते. हे वातावरण भातरोपांना त्रासदायक ठरत होते. चिपळूणसह संगमेश्वर, रत्नागिरीत कातळपरिसरात भाताच्या रोपांची वाढ अर्धवट राहिलेली होती. काही ठिकाणी भातपिकेही कोमेजली. कोकणातील फरंपरिक भातशेतीसाठी जुलै महिन्यात नियमित पाऊस आवश्यक असतो. त्यात अडथळा आल्याने चिंता निर्माण झाली होती.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे भातशेती, भाजीपाला व फळझाडांना अश्वश्यक पाणी मिळू लागले आहे; मात्र पावसाचा जोर कायम राहणे आवश्यक आहे. सध्या दिवसा कडकडीत ऊन आणि रात्री पाऊस, अशी स्थिती सर्वत्र आहे. सध्या पडलेल्या सरीमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहिलेला आहे. परिणामी, पिकांची वाढ सुरळीत होईल अशी शक्यता आहे.
धरणे भरली पाण्याने
यंदा चिपळूणमध्ये गतवर्षर्षीपेक्षा ६२३ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी जुलैअखेर २८९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र जुलैअखेर २२६८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तरीही परिसरातील आंबतखोल, कुचांबे, डेरवण येथील धरणे पाण्याने ओसंडून वाहू लागली आहेत.
संध्याकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे भातशेतीला कोणताही धोका नाही. आतापर्यंत कोठेही कीडरोग आढळलेले नाहीत. भातशेतीसाठी पूरक वातावरण आहे- शिवकुमार सदाफुले, जिल्हा कृषी अधीक्षक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 06/Aug/2025














