राजापूर : कोदवली पुनर्वसन वसाहतीत कचऱ्याचे साम्राज्य

राजापूर : शहरानजीकच्या कोदवली ग्रामपंचायत हद्दीतील पुनर्वसन वसाहत पुन्हा कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड झाले आहे. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कोदवली ग्रामपंचायतीने याची दखल घेत पुनर्वसन वसाहतीमधील कचरा उचलण्यासाठी घंटागाडीचे नियोजन करून कचरा उचलण्यास सुरुवात केली होती. मात्र, कोदवली ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंडच नसल्याने घंटागाडी बंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील सर्वांत जास्त महसूल गोळा करणारी कोदवली ग्रामपंचायत पुनर्वसन वसाहतीमधील कचऱ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करणाऱ्या ग्रामपंचायतीला कचरा डम्पिंगसाठी जागा मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

राजापूर शहरात १९९३ साली पूररेषा अस्तित्वात आल्यानंतर शासनाने शहराजवळच कोदवली ग्रामपंचायत हद्दीत पुनर्वसन वसाहत निर्माण केली आहे. सध्या या भागात साधारण ३५० भूखंडांवर पूरग्रस्तांनी बांधकाम केले आहे. ही वसाहत उभी करताना हा भाग राजापूर नगर परिषद हद्दीत जोडणे आवश्यक होते. मात्र, शासनाने त्याकडे दुर्लक्ष करून वसाहतीचा भाग कोदवली ग्रामपंचायत हद्दीत समाविष्ट केला आहे.

या आधी नगर परिषदेनेही हद्द वाढीसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळी ग्रामपंचायतीने हद्दीत समाविष्ट होण्यास नकार दिला. मात्र, आता देताना सोयीसुविधा ग्रामपंचायतीच कमी पडत आहे. सध्या या वसाहतीतील तहसील निवास, गॅस एजन्सी व हॉटेल वॉटर येथील वळणाच्या पुढे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 06/Aug/2025