रत्नागिरी : ‘दिव्यांग’ कर्मचाऱ्यांना पेन्शनची प्रतीक्षाच

रत्नागिरी : दिव्यांग कर्मचाऱ्यांची सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांची पेन्शन अद्यापही जमा झालेली नाही. त्यामुळे दिव्यांगांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गणपतीप्रमाणेच दिवाळीमध्येही त्यांना पेन्शनची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जिल्ह्यात जोरात आहे. निवडणुकीपूर्वी ही योजना तळागाळात पोचविण्यासाठी आचारसंहितेपूर्वी सरकारने आणि शासनाने कडक भूमिका घेतली होती. तसे असले तरीही दिव्यांगांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. गणपती गेले, दिवाळी आली तरीही पेन्शनची दिव्यांगांना प्रतीक्षाच आहे.

मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाचीही दखल शासनाने न घेतल्यामुळे नाराजीत भर पडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसात सरकारने शेकडो निर्णय घेतले. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्याची पेन्शन जमा करण्याविषयी कानाडोळा केला गेला. केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता, सहायक उपकरणांसाठी मागील सहा वर्षांपासून थकित असलेले अनुदान व अनुशेष, पदोन्नती या मागण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलनही केले. त्याची दखल न घेतल्यामुळे दिव्यांग कर्मचारी संतापलेले आहेत, असे दिव्यांग समन्वय समिती जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी सांगितले.

संघर्ष हा अटळ आहे. तो दिव्यांगांच्या पाचवीलाच पुजला आहे. सर्वसामान्य दिव्यांग व दिव्यांग कर्मचारी एकत्र येऊन अन्यायाविरोधात पेटून उठला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आझाद मैदान येथे जमलेल्या हजारो दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणान्या शासनाला धडा शिकवू, संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य दिव्यांग कर्मचारी यांना एकत्रित करण्यासाठी कटिबद्ध आहोत. दिगंबर घाडगे पाटील, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 18/Oct/2024