चिपळूण: गोवा राज्यातून अवैध मार्गाने आणलेल्या दारूचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने चिपळूण तालुक्यातील वालोपे गावात जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ₹५,६७,८४० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क, चिपळूण कार्यालयाच्या पथकाने ५ ऑगस्ट २०२५ रोजी वालोपे गावातील तांबीटकरवाडी येथे मोहन लक्ष्मण तांबीटकर यांच्या घराजवळ छापा टाकला. या छाप्यात, एका पडवीत लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या दारूचे ६३ बॉक्स आढळले. या दारूची महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यास बंदी आहे. पथकाने हा संपूर्ण ५५६.९२ ब.लि. साठा जप्त केला.
या प्रकरणी प्रवीण गणपत तांबीटकर याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि रत्नागिरीच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
चिपळूण येथील निरीक्षक सुनील आरडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकात जवान शुभम काडापुरे, निखिल लोंढे, मयूर पुरीबुवा आणि वाहनचालक विशाल विचारे यांचा समावेश होता. पुढील तपास निरीक्षक सुनील आरडेकर करत आहेत.
अवैध दारूबाबत माहिती देण्याचे आवाहन
जिल्ह्यात कुठेही अवैध दारूची निर्मिती, विक्री, वाहतूक किंवा साठा होत असल्यास नागरिकांनी विभागाच्या ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.













