चिपळूण : भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा क्रिस्टा कारने जोरदार धडक दिल्याने एका ५५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिपळूण शहरातील चिंचनाका ते बहादूरशेख नाका रोडवर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास चिंचनाका-बहादुरशेख नाका रोडवरील रॉयल इंटरप्रायझेस शॉप आणि स्वामी इंटरप्रायझेस शॉप समोर घडली. मयत व्यक्तीचे नाव रमेश बंड कलकुटकी (वय ५५, रा. वडार कॉलनी, बहादुरशेख नाका) असे आहे.
या अपघाताबाबत मयत व्यक्तीचा मावस भाऊ सुनील यल्लाप्पा कलकुटकी (वय ४९) यांनी चिपळूण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, एम.एच.०८/ए.झेड/७०७७ क्रमांकाची इनोव्हा क्रिस्टा कार चालक अभिजीत जयंद्रथ खताते (रा. खेर्डी, ता. चिपळूण) हा अत्यंत निष्काळजीपणे आणि हयगयीने गाडी चालवत होता. याच निष्काळजीपणामुळे त्याने रमेश कलकुटकी यांना जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने रमेश कलकुटकी यांचा जागीच मृत्यू झाला.
या तक्रारीनंतर पोलिसांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी अभिजीत खताते विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०६ (१) आणि २८१ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 07-08-2025









