गोळप दर्ग्याजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीला अटक

रत्नागिरी : रत्नागिरी-पावस रोडवर गोळप दर्ग्याजवळील आर्वी रसवंती सेंटरजवळ रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला पूर्णगड सागरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक लोखंडी सुरा जप्त केला आहे.

ही घटना ५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक संदीप गजानन महाडीक (पो.ना./२९५) यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविंद्र भिकाजी जांभळे (वय ६२, रा. गोळप, कातळवाडी, रत्नागिरी) हा काळोखात आपली ओळख लपवून संशयास्पद हालचाली करत होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याच्याजवळ एक लोखंडी सुरा आढळून आला.

जप्त करण्यात आलेला सुरा सुमारे ५० रुपये किमतीचा असून, त्याला १५ सेंमी लांबीची लोखंडी मूठ आणि २१ सेंमी लांबीचे गंजलेले पाते आहे. पोलिसांनी संशयास्पद कृती आणि हत्यार बाळगल्याप्रकरणी जांभळे यांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी ६ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजून ४७ मिनिटांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ५७/२०२५ नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जांभळे याचा कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो सुरा जवळ बाळगत असावा, असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 07-08-2025