खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडे चोरीसाठी वापरली जाणारी लोखंडी सळी आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
ही घटना ६ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास इंद्रप्रस्थ बार ते जास बाईक रिपेअरिंग सेंटर आणि डायमंड सलून या परिसरामध्ये घडली. खेड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल माणिकराव पवार (वय ३१) यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल पवार आणि त्यांचे सहकारी रात्रीची गस्त घालत असताना, आरोपी हरी रामशब्द लाल (वय ३८, रा. सिंगही, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) हा हातात एक लोखंडी सळी घेऊन संशयास्पद स्थितीत फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले असता, तो पळून जाऊन डायमंड सलून नावाच्या दुकानाच्या अंधारात लपून बसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्याच्याजवळ २४ इंच लांबीची एक लोखंडी सळी आढळून आली.
आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत फिरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५० रुपये किमतीची ही लोखंडी सळी जप्त केली आहे. या प्रकरणी ६ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २४९/२०२५ नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १२२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 07-08-2025














