लांजा : चोरीची इलेक्ट्रिक वायर विकण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका व्यक्तीवर लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वैभव वसाहत येथे घडली असून पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ३,२०० रुपये किमतीची इलेक्ट्रिक वायर जप्त केली आहे.
ही घटना ६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी घडली. लांजा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक योगेश चंद्रकांत धोंडे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वैभव वसाहत येथील आरोपी जयवंत वसंत जाधव (वय ५०, रा. घर नं. ३९१२, लांजा) यांच्या घरासमोर छापा टाकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत जाधव याने चोरीची असल्याचा संशय असलेली इलेक्ट्रिक वायर आपल्या जवळ बाळगली होती. ती लबाडीने मिळवून विकण्याच्या इराद्याने त्याने ती ठेवली होती, अशी पोलिसांना खात्री पटली. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ८ किलो वजनाची, काळ्या रंगाच्या प्लास्टिक कव्हर असलेली गोलाकार गुंडाळलेली इलेक्ट्रिक वायर जप्त केली. या वायरची अंदाजे किंमत ३,२०० रुपये आहे. तसेच, ती ठेवण्यासाठी वापरलेली पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची पिशवीही जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी ६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजून ३९ मिनिटांनी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १५२/२०२५ नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांजा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 07-08-2025














