भरत गोगावले एसटी महामंडळाचे अध्यक्ष

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना आणि नेत्यांना बळ देण्याचं काम सुरु ठेवलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यासोबत असलेल्या आमदारापैकी सर्वाधिक चर्चेत असलेले आमदार म्हणून भरत गोगावले यांची ओळख आहे.

भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागेल आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र, विधानसभेचा कार्यकाळ संपत आला तरी भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं. अखेर, राज्य सरकारनं शुक्रवारी शासन निर्णय जारी करत भरत गोगावले यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. भरत गोगावले यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट, हेमंत पाटील, आनंदराव अडसूळ यांना विविध मंडळांवर नेमलं होतं. त्यावेळेपासूनच भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचं अध्यक्ष दिलं जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं असून भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचं अध्यक्ष म्हणून नेमण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

भरत गोगावलेंकडे एसटीचं अध्यक्षपद

महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार जो परिवहन मंत्री असतो तोच एसटी महामंडळाचा अध्यक्ष असतो. त्यामुळं भरत गोगावले यांची नियुक्ती लांबणीवर पडली होती. भरत गोगावले यांनी आज दुपारी एबीपी माझासोबत बोलताना एसटी महामंडळाबाबत आमची बोळवण केली जात आहे हा विषय नाही, असं म्हटलं होतं. हे महामंडळ आताच का दिल जातयं, या मागचं मुख्यमंत्र्यांचं कारण काय हे जाणून घेणयासाठी मुख्यमंत्र्यांना आज रात्री भेटणार असल्याचं म्हटलं होतं. एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारायचं की नाही ठरवणार असल्याचं म्हटलं होतं.

संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा चार्ज स्वीकारला असून त्यांचा सत्कार करताना देखील भरत गोगावले यांनी एसटी महामंडळाचा चार्ज स्वीकारला नसल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्यानंतर मंत्रिपदासाठी भरत गोगावले आग्रही होते. भरत गोगावले यांनी रायगडचं पालकमंत्रिपद मिळावं, अशी अपेक्षा ठेवली होती. भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी शिवलेल्या कोटाची देखील जोरदार चर्चा होत आलेली आहे. आता राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं नसलं तरी भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मात्र देण्यात आलं आहे.