खेड : खेड-भरणे मार्गासह शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. ही बाब नगरपालिका प्रशासनापुढे मांडण्यासाठी खेड शहर मनसेने ‘रिल्स स्पर्धेचे’ आयोजन केले आहे. त्यासाठी ‘खड्ड्यात गेले खेड’ हा विषय देण्यात आला असून, प्रभावी आणि व्यंगात्मक रिल्स बनवणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती मनसे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांनी दिली.
खेड-भरणे मार्ग तीनबत्ती नाका छत्रपती शिवाजी चौक खेड-दापोली मार्ग खेड-भोस्ते मार्ग या ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी देखील प्रशासन केवळ मलमपट्टी करून प्रश्न धुवून टाकत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. ही स्पर्धा वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जात असून तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष कानडे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 07/Aug/2025














