चिपळूण : परशुराम घाटातील कोसळणाऱ्या दरडींवर उपाय शोधण्यासाठी ‘टीएचडीसीएल’चा सल्ला

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सातत्याने संरक्षक भिंती कोसळत आहेत. या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने गंभीर दखल घेतली असून, ज्या प्रमाणे परशुराम घाटातील वरच्या बाजूच्या भागातील कोसळणाऱ्या दरडींवर उपाय शोधण्यासाठी ‘टीएचडीसीएल’ (तेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कार्पोरशन लिमिटेड) या संस्थेचा सल्ला घेण्यात आला. त्याच धर्तीवर आता परशुराम घाटातील दरीच्या बाजूकडील महामार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या संस्थेचा सल्ला घेतला जाणार आहे.

गतवर्षी १६ ऑक्टोबर याच दिवशी शहरातील बहादूरशेख चौक येथील निर्माणाधीन उड्डाण पूल कोसळला आणि दुर्घटना घडली. याहीवर्षी याच दिवशी परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली. (तेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कार्पोरशन लिमिटेड) या संस्थेची टीम परशुराम घाट व कशेडी बोगद्यालगत पाहणी करणार असून, त्यांच्या अहवालानंतरच या ठिकाणी उपाययोजना केल्या जाणार आहेत. तोपर्यंत परशुराम घाटात तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेले आठ-दहा दिवस सातत्याने पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका महामार्गाला बसला. भरावावर केलेले कॉक्रिटीकरण खचले आणि संरक्षण भिंत कोसळली असा प्राथमिक अंदाज राष्ट्रीय महामार्ग विभागाने काढला आहे. मात्र, सातत्याने अशा घटना घडत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक धोकादायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर उपाययोजना केल्या जात आहेत.

आ. शेखर निकम यांनी गुरुवारी या भागाची पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांनी तत्काळ दखल घेत पाहणी केली व हा अहवाल केंद्रीय स्तरावर पाठविण्यात आला आहे. तसेच उत्तराखंड येथील टीएचडीसीएल या संस्थेला पाठविण्यात आला आहे. या संस्थेची टीम परशुराम घाटात येऊन पाहणी करणार आहे. यानंतरच दरीकडील भागाच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात या बाबत या संस्थेकडून मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

वायरनेटिंग दरडींचा धोका टळणार
परशुराम घाट व नव्या कशेडी बोगद्याजवळ दरडी कोसळू नयेत म्हणून कोकण रेल्वेच्या धर्तीवर उपाययोजना केल्या जाणार आहेत. या संदर्भात टीएचडीसीएल संस्थेने जागेवर जाऊन पाहणी केली होती व त्यांचा अहवाल आता राष्ट्रीय महामार्ग विभागाला प्राप्त झाला असून परशुराम घाट व कशेडी बोगद्याच्या दुतर्फा दरडी कोसळून नयेत म्हणून ‘वायरनेटिंग हायड्रो’, रॉक बोल्टिंग आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी ३८ कोटींच्या निविदेलादेखील मंजुरी मिळाली आहे. पुढच्या पावसाळ्यापूर्वी परशुराम घाट व कशेडी टनेल या भागातील दरडींचा धोका टाळण्यासाठी एका वर्षाच्या आत या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 18/Oct/2024