राजापूर : राजापूर तालुक्यातील शीळ जॅकवेलजवळ अर्जुना नदीच्या पात्रात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. राजापूर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
ही घटना ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ ते ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली. मयत व्यक्तीचे नाव सुरेश सदाशिव बेंद्रे (वय ६५, रा. दोनिवडे, बेंद्रेवाडी, ता. राजापूर) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश बेंद्रे हे ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला होता. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अर्जुना नदीच्या पात्रात शीळ गावातील जॅकवेलजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक ४४/२०२५ नुसार बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 07-08-2025














