संगमेश्वर : देवरूखजवळील कोसुंब ते ताह्माणे या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ व प्रवाशांचे हाल झाले आहेत. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा संशय ग्रामस्थांकडून केला जात आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत कोसुंब ताह्माणे रस्त्याचे काम झाले होते. मात्र, त्या वेळी कामाच्या दर्जाबाबत तक्रारी उपस्थित केल्या होत्या. माजी उपअभियंत्यांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत काम पूर्ण करून घेतले. परिणामी, आता त्या रस्त्याची चाळण झाली आहे. दररोज शाळकरी मुले, वयोवृद्ध व नोकरीसाठी जाणारे नागरिक यांना या खडबडीत रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या रस्त्याच्या कामासंदर्भात कुठलाही माहिती फलक लावण्यात आलेला नाही. हे संपूर्ण काम गुप्तपणे ठेवले आहे, असा आक्षेप माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी घेतला आहे.
गुरव म्हणाले, या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अर्ज देण्यात येणार आहे तसेच, प्रत्यक्ष कार्यालयात जाऊनही याची सविस्तर माहिती दिली जाईल. दोषी अभियंता व संबंधित ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी केली आहे. सार्वजनिक निधी खर्च करून उभारलेल्या रस्त्याचे काम दीर्घकाळ टिकावे, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 07/Aug/2025














