दापोलीतून जवानांसाठी ‘एक राखी’ अभियान; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या सैनिकांना पाठवल्या राख्या

दापोली : कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या ‘युवा प्रेरणा कट्टा’ टीमने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दापोलीत ‘एक राखी जवानांसाठी; देशाच्या रक्षकांसाठी’ हा स्तुत्य उपक्रम आयोजित केला होता. यंदाच्या वर्षीच्या या उपक्रमाला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पहलगाम हल्ल्याचा यशस्वी बदला घेतलेल्या भारतीय सैन्य दलाप्रती आदर व्यक्त करणे हा यावर्षीच्या अभियानाचा मुख्य उद्देश होता.

विद्यार्थिनी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या उपक्रमात दापोलीतील विविध शाळा, महाविद्यालये तसेच सामान्य महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मोठ्या संख्येने राख्या जमा केल्या. या राख्यांमधून देशभक्तीची भावना आणि सैनिकांप्रती कृतज्ञता दिसून आली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद पांगारकर, नचिकेत बेहरे, संदीप गरंडे, श्रीप्रीती वैद्य, साक्षी करमरकर, सुमेध करमरकर आणि रोहन भावे यांच्यासह युवा टीमने अथक परिश्रम घेतले.

२०२२ पासून सुरू झालेला उपक्रम

या उपक्रमाबद्दल बोलताना मिहीर महाजन यांनी सांगितले की, “भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा, म्हणजेच २०२२ मध्ये, या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही ७५ हून अधिक शाळा-महाविद्यालयांमधून राख्या जमवून सीमेवर पाठवल्या होत्या. तेव्हापासून दरवर्षी हा उपक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो.”

यावर्षीच्या राख्या कुठे पाठवल्या?

यावर्षी जमा झालेल्या राख्या पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय वायू सेनेच्या हवाई तळावरील जवानांना तसेच मुंबई येथील सशस्त्र सेना सामान चिकित्सा डेपो (Armed Forces Medical Stores Depot) येथील कार्यालयातही रवाना करण्यात आल्या. दापोलीतील या उपक्रमामुळे जवान आणि सामान्य नागरिक यांच्यात एक भावनिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा बंध निर्माण होण्यास मदत झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 07-08-2025