रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक असोसिएशनच्या वतीने २३ व २४ ऑगस्ट या कालावधीत रत्नागिरी जिल्हा ज्युनिअर अॅथलेटिक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डेरवण क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेतून राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड केली जाणार आहे.
३९वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर अॅथलेटिक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत पुणे येथे होणार आहे. ही स्पर्धा १४, १६, १८, २० आणि २३ वर्षांखालील मुले व मुली या गटासाठी आहे. खेळाडूंनी आपल्या वयोगटात सहभागी होणे आवश्यक आहे. १२ वर्षांखालील खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. सर्व खेळाडूंनी २१ ऑगस्टपूर्वी ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक स्पर्धेपूर्वी दोन दिवस अगोदर जाहीर करण्यात येईल.
एका स्पर्धकाला त्याच्या वयोगटात फक्त दोन क्रीडा प्रकारांत सहभागी होता येईल. पात्रता निकष पार करणाऱ्या प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. खेळाडूंनी सोबत येताना वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला, १०वी व १२वीचे बोर्ड प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप तावडे यांच्याशी संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 07/Aug/2025














