रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालयाचा ४५ वा स्थापना दिन साजरा करत असताना महाविद्यालयाचे विद्यापीठातील व मत्स्य शास्त्रातील योगदान महत्त्वाचे आहे. गेल्या ४४ वर्षांत महाविद्यालयाने शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण या तिन्ही आघाड्यांवर ठसा उमटवला आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जगभर आपल्या कामाने महाविद्यालयाचे तसेच विद्यापीठाचे नाव झळकवत आहेत. याचा सार्थ अभिमान कुलगुरू या नात्याने मला आहे, असे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल कमांडंट डॉ. संजय भावे यांनी केले.
शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाच्या स्थापना दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कुलगुरू डॉ. भावे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते म्हणाले, महाविद्यालयाचे पाच माजी विद्यार्थी हे मत्स्य शास्त्राच्या विविध क्षेत्रांत आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत आहेत आणि हेच विद्यार्थी महाविद्यालयाचे खरे ‘सेलेब्रिटी’ आहेत.
याप्रसंग कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, मत्स्य जलशास्त्र व मत्स्य जीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. आसिफ पागारकर, डॉ. दबीर पठाण आदी उपस्थित होते. यात हर्षद कारुळकर, विनय सावंत, अभिषेक पवार, नरेंद्र देशमुख, गजानन काटे हे उपस्थित होते.
रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय हे संपूर्ण भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मत्स्य शास्त्रातील अभ्यासक्रम राबविणारे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाचे विद्यार्थी केंद्र सरकार, राज्य सरकार, खासगी क्षेत्र आदी ठिकाणी उच्च पदांवर कार्यरत असल्याचे पावसे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 07/Aug/2025














