रत्नागिरी : जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या ५६४ योजना शंभर टक्के पूर्ण

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०२४-२५ या वर्षांसाठीच्या कृती आराखड्याची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, जिल्ह्यासाठी एकूण १४३२ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या, त्यापैकी १४२८ योजनांचे कायदिश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये १५ योजना रद्द करण्यात आल्या असून, १४१३ योजना प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील ५६४ योजना १०० टक्के पूर्ण झालेल्या आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय कामांची माहिती पाहता चिपळूण तालुक्यात १३४ पैकी १३३ योजनांचे कार्यदेश देण्यात आले आहेत. त्या सर्व सुरू आहेत. दापोलीमध्ये १५९, गुहागरमध्ये ११२ पैकी १११, खेडमध्ये २०५ पैकी २०४, लांजात १२३ पैकी १२२, मंडणगडमध्ये १०४, राजापूरमध्ये २०५, रत्नागिरीत १८२ आणि संगमेश्वरमध्ये २०८ अशा प्रकारे सर्व तालुक्यांमध्ये कामांना सुरुवात झाली आहे. या
आकडेवारीनुसार, ८ योजना अद्याप सुरू झालेल्या नाहीत.

यात गुहागरच्या ४ आणि खेडच्या २ योजनांचा समावेश आहे. प्रगतीचा आढावा घेतला असता ०-२५ टक्के पूर्ण झालेल्या योजना एकूण ५४ योजना आहेत. यात राजापूरमध्ये सर्वाधिक १२ आणि चिपळूणमध्ये ९ योजनांचा समावेश आहे. २५-५० टक्के पूर्ण झालेल्या योजना या टप्प्यात १७५ योजना आहेत. राजापूरमध्ये सर्वाधिक ५७ आणि गुहागरमध्ये २२ योजना आहेत. ५०-७५ टक्के पूर्ण झालेल्या एकूण ३०७ योजना या टप्प्यात आहेत.

यात राजापूरमध्ये ४२, रत्नागिरीत ३० आणि दापोली व खेडमध्ये प्रत्येकी ३३ योजना आहेत. ७५-१०० टक्के पूर्ण झालेल्या सर्वाधिक ३०५ योजना या टप्प्यात असून, दापोलीमध्ये सर्वाधिक ४८ योजना या टप्प्यात आहेत. १०० टक्के पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील ५६४ योजना असून, गुहागरमध्ये सर्वाधिक ७० योजना पूर्ण झाल्या आहेत.

एकूण १ हजार ४३२ योजनांवर १ लाख १० हजार ३७७ लाख रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. तालुकानिहाय खर्चाचा अंदाज पाहता, गुहागरसाठी सर्वाधिक २१ लाख २२० रुपयांचा तर संगमेश्वरसाठी १७ लाख २६८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मंडणगडसाठी सर्वांत कमी ४ लाख ३४६ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कामे जलदगतीने सुरू असून, अनेक योजना अंतिम टप्प्यात आहेत. यामुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांना गती मिळणार आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 07/Aug/2025