भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे. बंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली.
दुखापतीनंतर काही वेळातच त्याच्या गुडघ्याला सूज आली. ज्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. ध्रुव जुरेलने शेवटच्या सत्रात विकेटकीपिंग केले. आता पंत तिसऱ्या दिवशी विकेटकीपिंग करणार नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात तिसऱ्या दिवशी यष्टिरक्षकाची जबाबदारी ध्रुव जुरेल कडे आहे.
ऋषभ पंतने पहिल्या डावात टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. संघाचे 9 फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले, त्यापैकी पाच शून्यावर बाद झाले. दरम्यान, पंतने 49 चेंडूत 20 धावांची खेळी केली होती.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पंतच्या दुखापतीबाबत अपडेट देताना सांगितले होते की, “आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही, ज्या पायाला त्याला आता दुखापत झाली आहे तेथे याआधीही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पंत तिसऱ्या दिवशी मैदानात उतरेल, अशी आशा कर्णधार रोहितने दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर व्यक्त केली होती, मात्र तिसऱ्या दिवशी त्याला मैदानात उतरवता न आल्याने टीम इंडियाचा ताण वाढला असावा.
दुखापत कशी झाली?
बंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा गोलंदाजी करत होता. डेव्हॉन कॉनवे स्ट्रायकिंग एंडला होता, पण दरम्यान जडेजाचा चेंडू सरळ राहिला. जो पंतल नीट पकडता आला नाही, त्यामुळे चेंडू त्याच्या उजव्या गुडघ्याला लागला. पुढच्याच क्षणी पंत मैदानावर पडून राहिला. पंतला पाहण्यासाठी भारतीय संघाचे फिजिओ लगेच धावत आले. पण पंत नीट उभा राहत नव्हता, त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 18-10-2024