रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासकीय जिल्हा परिषद, अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. यावर्षी विषयनिहाय पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहेत. उर्दू माध्यमाच्या पहिलीत शिकणाऱ्या एक हजार १० विद्यार्थ्यांना मजेत शिकू या मराठी विषयाची पुस्तके अद्याप उपलब्ध झालेली नाहीत.
नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरू होऊन दोन महिने लोटले. पहिली घटक चाचणी काही शाळेत सुरू झाली आहे, तरीही विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. छपाईसाठी विलंब झाला असल्याचे कारण सांगण्यात येत आहे; परंतु येत्या दोन दिवसांत पुस्तके उपलब्ध होतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
पुस्तके उपलब्ध नसल्याने शिक्षक गतवर्षीच्या पुस्तकाचा आधार घेत विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यामुळे नवे वर्ष; पण पुस्तके जुनी असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. पहिलीच्या वर्गाची पुस्तके असल्यामुळे या विषयांकडे फारसे गांभीर्याने पहिले जात नाही. जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ६ लाख दोन हजार ५१२ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी सहा लाख एक हजार ५०२ पुस्तके प्राप्त झाली आहेत.
पहिलीच्या वर्गातील उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मजेत शिकू या मराठी या विषयाची एक हजार १० पुस्तके छपाई कामाच्या विलंबामुळे उपलब्ध होण्यास दिरंगाई झाली आहे.
उर्दू भाषेची पुस्तके उपलब्ध होणार
समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके उपलब्ध झाली; परंतु उर्दू माध्यमाची पहिलीच्या वर्गाची मराठी भाषेची पुस्तके उपलब्ध झाली नव्हती; परंतु येत्या दोन ते तीन दिवसांत उपलब्ध होणार असल्याचे प्राथमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 07/Aug/2025












