Ganeshotsav 2025, Ratnagiri : परतीच्या प्रवासासाठी ५०० एसटी बसेसचे बुकिंग

रत्नागिरी : कोकणातील गणेशोत्सवासाठी चाकरमानी आपल्या गावी येत असतात, त्यांचा प्रवास चांगला, सुखकर व्हावा म्हणून रत्नागिरी एसटी विभागाकडून परतीच्या प्रवासासाठी २,५०० एसटी बसेसचे नियोजन केले आहे. दरम्यान, ऑनलाईन तिकीट आरक्षणास चाकरमान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ऑनलाईन आरक्षणातून ५०० हुन अधिक एसटी बसेसच्या बुकिंग झाल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी तिकीट बुकिंग केले नाही त्यांनी लवकरात लवकर तिकीट बुकिंग करावे, असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले.

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून यंदाचा गणेशोत्सव कोकणासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात, दणक्यात साजरा होणार आहे. कोकणातील कित्येक चाकरमानी मुंबई, पुणे, हैदराबादसह अन्य शहरात असतात. गणेशोत्सवासाठी प्रत्येक कोकणकर आपल्या मुळगावी येत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने ५ हजारांहुन अधिक बसेसची सोय केली आहे. २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान, मुंबईसह अन्यठिकाणातून एसटी बसेस सोडण्यात येणार आहे. मुंबईतून कोकणात येण्यासाठी तिकीट बुकिंग मोठ्या प्रमाणात झाली आहे. गणेशोत्सवानंतर परतीचा प्रवास चांगला व्हावा यासाठी रत्नागिरी विभागातून तब्बल २५०० एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. २२ जुलै पासून ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुरुवात झाली. आतापर्यंत ५०० हून अधिक एसटी बसेसची बुकिंग झाली असल्याचे सांगण्यात आले. तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांना १५ टक्के सवलत तसेच ७५ पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना मोफत तर ६५, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ ही प्रवाशांनी घ्यावा, असेही सांगण्यात आले.

इथे करा तिकीट बुकिंग
रत्नागिरी विभागातून परतीच्या प्रवासासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहे. परतीच्या प्रवासासाठी आरक्षण खुले झाले आहे. प्रवाशांनी https://npublic.msrtcors.com या संकेत स्थळावर तसेच एमएसआरटीसीच्या ऑनलाईन अॅपद्वारे तिकीट बुकिंग करू शकता. आरक्षण संबंधित बसस्थानकावर ही करता येईल.

गणेशोत्सानंतर चाकरमान्यांना मुंबईत जाण्यासाठी परतीच्या प्रवाशाचे आरक्षण खुले झाले असून, चाकरमान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिलेल्या वेबसाईट, अॅपवरून तिकीट बुकिंग करून आपला प्रवास सुनिश्चित करावा. प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 07/Aug/2025