खेडमधील ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडांची दुरवस्था

खेड : खेड शहरातील ऐतिहासिक आणि वारसा स्थळ असलेले गरम पाण्याचे कुंड गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत राहिले असून, पुन्हा एकदा त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी महाराजा प्रतिष्ठान आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही कुंड नागरिकांसाठी खुली करण्यात आली होती. मात्र खेदाची बाब म्हणजे खेड नगरपरिषदेच्या उदासीनतेमुळे या कुंडांची पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात दैनावस्था झाली आहे.

सदर कुंडांची स्वच्छता आणि देखभाल न झाल्यामुळे येथील सौंदर्य व ऐतिहासिक महत्त्व पुन्हा हरवण्याच्या मार्गावर आहे. या कुंडांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी खेड नगरपरिषदेवर असताना, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी दहा वर्षांपूर्वीचीच स्थिती आज पुन्हा दिसून येत आहे.

यासंदर्भात महाराजा प्रतिष्ठान आणि दुर्ग सेवक संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयालयात निवेदन देण्यात आले. प्रशासनाने १२ ऑगस्टपर्यंत कुंडांची योग्य ती स्वच्छता व दुरुस्ती करून ती पुन्हा जनतेसाठी खुली न केल्यास १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व दुर्ग सेवक व महाराजा प्रतिष्ठानचे सचिव प्रणव मापुस्कर करणार असून, महाराजा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक निखिल जामसंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी किरण तायडे, स्वराज गांधी, नरेंद्र जाधव, अभिजीत मुंडेकर, आर्यन मापुस्कर आदी उपस्थित होते.

खेड शहराच्या ऐतिहासिक ओळखीचा भाग असलेल्या या कुंडांचे संरक्षण करणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी या वारसास्थळाचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 07/Aug/2025