गुहागर : गणेशोत्सव आणि कोकण यांचं अतूट नातं आहे. गणेशोत्सव अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपला असताना कोकणात गणरायाच्या स्वागताची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असल्याचे दिसून येत आहे. सध्या आबलोली बाजारपेठेत वाद्य निर्मिती आणि दुरुस्तीच्या दुकानात मोठ्या प्रमाणात लगबग दिसून येते.
तालुक्यातील आबलोली बाजारपेठ ही परिसरातील सुमारे वीस-पंचवीस गावांसाठी महत्त्वाची म्हणून ओळखली जाते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या बाजारपेठेत लगबग दिसून येत आहे. अनिल पालशेतकर यांच्या वाद्यालयात सध्या पखवाज, नाळ, ढोलकी, ताशा, ढोल, मृदुंग यांची दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. चार पिढ्यांपासूनची वाद्य दुरूस्तीची कला पालशेतकर जपत आहेत. सध्याच्या महागाईच्या काळात वाद्य विक्री आणि दुरुस्ती यामध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याचे पालशेतकर सांगतात. या व्यवसायामध्ये त्यांचे आई-वडील, पत्नी, मुले आणि कुटुंबीय यांचे सहकार्य लाभते. अवघ्या वीस दिवसांवर गणेशोत्सव असून बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 07/Aug/2025












