अपार आयडी : विद्यार्थ्यांची ‘एज्युकेशन हिस्ट्री’ आता क्लिकवर..!

रत्नागिरी : केंद्र शासनाकडून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांला अपार आयडी तयार करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार अपार आयडी तयार करण्यासाठी केंद्र शासनाने यू डायस प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या एज्युकेशन हिस्ट्रीबरोबर प्रत्येक आधार कार्डनुसार १२ अंकी अपार आयडी तयार करण्यात येणार आहे. अपार आयडीमुळे विद्यार्थ्यांची डिजिटल माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अपार आयडी हा १२ अंकी असून, विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित असणार आहे. यू डायस प्लस प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची आधार पडताळणी झाली आहे त्याच विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यात येणार आहेत. अपार आयडी तयार करण्याबाबत राज्यस्तरावरील आणि जिल्हास्तरावरील प्रशिक्षण घेण्यात येणार आहेत. शाळा स्तरावर अपार आयडी तयार करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांचे हमीपत्र घेऊन पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

अपार आयडीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा मागोवा घेणे, गळतीचे प्रमाण कमी करण्यात मदत करणे आदी बाबी डिजिटल पद्धतीने नियंत्रित करण्यात येतील. अपार आयडी तयार झाल्यानंतर डीजी लॉकरला जोडण्यात येणार आहे. डीजी लॉकरला जोडल्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष्य, दहावी-बारावी बोर्ड परीक्षा तसेच विविध रिपोर्ट ऑनलाईन पद्धतीने बघता येणार आहेत.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी विद्या समीक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार असून, त्या माहितीवर ग्राफिकल विश्लेषण करण्यात येऊन प्रगती करण्याच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

‘अपार’चा उपयोग काय ?
ऑटोमेटेड परमनंट अॅकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री असे अपार कार्डचे नाव आहे. शिक्षण क्षेत्रातील लक्ष्य आणि परीक्षेचे निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठवता येणार आहेत. सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. अपार आयडी कार्डमुळे तुमची सर्व माहिती ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी फायदा होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
19:47 PM 18/Oct/2024