खेड : महामार्ग व राज्य मार्गांवरील कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडली. गणेशोत्सव काळात वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देशही ना. भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कशेडी ते रत्नागिरी दरम्यानच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी आज केली. या पाहणीदरम्यान कशेडी बोगद्याच्या पोलादपूर बाजूला मंत्री भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी उपस्थितांमध्ये शिवसेना (शिंदे गट) उपनेते व माजी आमदार संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय मोरे यांचा समावेश होता. या सर्वांनी ना. भोसले यांची भेट घेऊन महामार्ग कामाबाबत चर्चा केली.
यावेळी ना. भोसले म्हणाले, कशेडी बोगद्याच्या गळतीवर उपाययोजना सुरू कशेडी बोगद्यामध्ये सध्या गळती आहे, मात्र त्यामुळे बोगद्याला धोका नाही, असे स्पष्ट करत ना. भोसले यांनी सांगितले की, गळती पूर्णपणे थांबवण्यासाठी उपाययोजना सुरू असून ती लवकरच पूर्ण केली जाईल.
अपघातग्रस्त तरुणास मदतीचे आश्वासन
चिपळूण येथे सळई पडून जखमी झालेल्या तरुणाच्या उपचारासाठी संबंधित ठेकेदाराकडून मदत करण्यात येणार असल्याचेही ना. भोसले यांनी यावेळी जाहीर केले. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, नागरिकांच्या सोयीसाठी हे काम वेळेत पूर्ण करणे हे आमचे प्राधान्य आहे, असे ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 08/Aug/2025












