गणपतीपुळे : कोल्हटकर तिठ्यातील रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील आपटातिठा ते मालगुंड गणपतीपुळे या मुख्य मार्गावरील असलेल्या कोल्हटकर तिठ्यातील रस्त्यावर खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

अनेक दिवसांपासून या रस्त्यावर खड्ड्यांची समस्या असताना ती मार्गी लावण्यासाठी अद्याप संबंधित खात्याकडून कुठलीही ठोस कार्यवाही हाती घेतली जात नसल्याने संबंधित खात्या विरोधात स्थानिक वाहनचालक व पर्यटक वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गणपतीपुळे हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. मात्र या ठिकाणचे रस्ते पाहिले तर नक्की पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आलो आहोत की खेड्यातील दुर्गम ठिकाणी आलो आहोत असा प्रश्न पर्यटकांना पडतो. अत्यंत बिकट अशा रस्त्यावरून पर्यटकांना चालवावी लागत आहेत.

कोल्हटकर तिठ्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी खड्डे पडल्याची समस्या निर्माण झालेली आहे. तसेच याचा रस्त्यावर सांडपाण्याची ही समस्या कायमपणे भेडसावत असते. मात्र तरीसुद्धा स्थानिक ग्रामपंचायतीकडून कुठलेही गांभीर्यपूर्वक लक्ष दिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते. साचलेले पाणी आणि रस्त्यावर येणारे सांडपाणी अनेकांच्या अंगावर उडते. त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणारे स्थानिक नागरिक, आलेले पर्यटक आणि शालेय विद्यार्थी आदींना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने ही खड्ड्यांची समस्या नक्की थांबणार तरी कधी? असा प्रश्न सध्या केला जात आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायत आणि बांधकाम खात्याने गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्यासाठी ठोस कार्यवाही हाती घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 08/Aug/2025