चिपळूण : तालुक्यातील पुर्येतर्फे सावर्डे हे गाव अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात असून, तिथे बिबट्या व गव्याचा वावर जास्त प्रमाणात राहिला आहे. या गावातील शाळकरी मुले ८ किलोमीटर पायपीट करत शाळेत येतात. गेल्या अनेक वर्षांपासून चिपळूण आगारातून सोडण्यात येणारी वस्तीची बस अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली. ती नियमितपणे सुरू करा, अशी मागणी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
पुर्येतर्फे सावर्डे ग्रामस्थांनी चिपळूण आगारातील अधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन दिले. तालुक्याच्या टोकाला वसलेले हे गाव हा अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात आहे. अद्यापही येथे भौतिक सेवासुविधा निर्माण झालेल्या नाहीत. येथील विद्यार्थ्यांना सातवीनंतर माध्यमिक शिक्षणासाठी वहाळ येथे जावे लागते. या मार्गावरील वस्तीची बस बंद झाल्याने येथील विद्यार्थ्यांना जंगलातून ८ किमीचा पायी प्रवास करावा लागतो.
या भागात जंगली प्राण्यांचा सातत्याने वावर असतो; मात्र तरीही शिक्षणासाठी जीवाची पर्वा न करता विद्यार्थ्यांचा पायी प्रवास सुरू राहिला आहे. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी काळोखातून चालत घरी येतात. याच दरम्यान जर एखाद्या रेड्याने हल्ला केला तर विद्यार्थी जीव गमावू शकतो. चिपळूण आगारात ग्रामस्थांनी चौकशी केली असता त्यांना गाडीचे उत्पन्न कमी असल्याचे सांगण्यात आले. एसटी महामंडळाला ते परवडत नाही त्यामुळे गाडी सुरू करू शकत नाही, असे सांगण्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार दिली आहे.
गाडीचे उप्तन्न कमी
गाडीचे उप्तन्न कमी असले तरीही विद्यार्थ्यांची शैक्षणिक सुविधा तसेच या परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी बंद केलेली सेवा पुन्हा सुरू करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य उराशी बाळगून एसटी गावोगावी धावते; पण गरज असते तेव्हा एसटी महामंडळ मदतीला धावत नाही, असे त्या निवेदनात नमूद केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 18/Oct/2024












