गडसंवर्धन करणाऱ्यांना मिळणार ‘छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार’

चिपळूण : राज्यशासनातर्फे दरवर्षी गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. जागतिक वारसास्थळाच्या यादीत राज्यातील १२ जिल्ह्यांचा समावेश झाल्यानिमित्त यावर्षीपासून हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात गडकोट किल्ल्यांचा अभ्यास, त्याच्या संवर्धनात काम करणाऱ्यांना पुरस्काराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध आणि महत्त्वाचे किल्ले आहेत. त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या हर्णे (ता. दापोली) येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून मानांकन दिले आहे. त्याशिवाय रत्नागिरी शहराच्या जवळ रत्नागिरी किल्ला आहे.

जयगड हा समुद्राजवळ असलेला जलदुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्णगडजवळ हा किल्ले पर्यटनासाठी एक सुंदर ठिकाण मानला जातो. खेड तालुक्यात डोंगरावर पालगड हा किल्ला आहे. रत्नागिरीच्या जवळ भगवंतगड हा किल्ला प्रसिद्ध आहे. चिपळूणमधील गोविंदगडमह जिल्ह्यात अनेक किल्ले आहेत. हे किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृती, कला, साहित्य शौर्यासह गडकोट किल्ले समृद्ध वारसास्थळांत गडकिल्ले महत्त्वाचा घटक आहे.

स्वराज्य स्थापनेसाठी गडकिल्ल्यांचे महत्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची साखळी निर्माण केली, त्यांच्या जतन, संवर्धनासह आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून देण्यासाठी कार्यरत संस्था, व्यक्ती यांच्या योगदानाचा सन्मान शासन करणार आहे. किमान १० वर्षे कार्यरत असलेल्या संस्था अथवा व्यक्तीला तीन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.

गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार देण्याची शासनाची योजना अतिशय चांगली आहे. त्यातून किल्ले संवर्धनाच्या चळवळीला गती मिळेल. स्थानिकांचा सहभाग वाढेल आणि पर्यटनवाढीसाठी उपयोग होईल. समीर कोवळे, पर्यटन अभ्यासक चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 08/Aug/2025