लांजा : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गाईचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री मुंबई गोवा महामार्गावर लांजा रेस्ट हाऊस नजीक घडली आहे .या घटनेनंतर लांजा शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
लांजा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट गुरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही गुरे नजीकच्या परिसरातील शेतकऱ्यांची आहेत. मात्र तरीदेखील या गुरांकडे मालकांचे लक्ष नसल्याने ही गुरे मुंबई गोवा महामार्गावर बिनधास्तपणे बसुन राहिलेली आढळून येतात. लांजा साटवली फाटा, हायस्कूल, बाजारपेठ, लांजा पोलीस वसाहत, लांजा रेस्ट हाऊस या परिसरात ही गुरे बसलेली असतात. रात्रीच्या वेळी तर अनेकदा ही गुरे दिसत नसल्याने छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत.
यापूर्वी लांजा नगरपंचायतीकडून मोकाट गुरे पकडण्याची मोहीम देखील हाती घेण्यात आली होती. मात्र ही मोहीम काही दिवसातच थंडावल्याने पुन्हा एकदा लांजा शहरांमध्ये मोकाट गुरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही मुकाट गुरे बिनधास्तपणे मुंबई गोवा महामार्गावर बसलेली असल्याने बऱ्याचदा ट्रॅफिक जॅमची समस्या देखील उद्भवते .
अशाच प्रकारे मुंबई गोवा महामार्गावर लांजा रेस्ट हाऊस येथे बुधवारी रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका गाईचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे अपघात वारंवार घडत असल्याने व लांजा नगरपंचायतीकडून मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे
दुर्लक्ष झाल्याने मोकाट गुरांच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 08-08-2025












