मंडणगड : तालुक्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या दहागाव या गावास भगवान श्री शिवशंकाराचा आशीर्वाद लाभला आहे. भगवान शिवशंकर स्वयंभू श्री उतरेश्वर या नावाने या गावात विराजमान झाले आहेत. श्रावणातील सर्व सोमवारी महादेवांची शिवमहिमा पाठाने विशेष पूजा केली जात आहे. तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री उत्तरेश्वराच्या दर्शनसाठी अनेक गावांतून भाविकांची श्रावणात गर्दी होत आहे.
उत्तरेश्वरासंबंधी गावात प्रसिध्द असलेल्या आख्यायिकेनुसार अगदी प्राचीन काळी या गावात एक गरीब गृहस्थ रहात होते. त्यांच्याकडे एक गाय होती. त्याकाळी गाय हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असे. गाय दूध देण्याच्या वेळी पाडसाला पाजण्यास नकार देत असल्याने त्या गृहस्थाने या गाईवर पाळत ठेवली. गाय दूध का देत नाही, याचा शोध घेताना गावात सध्या उतरेश्वर स्थानापन्न असलेल्या ठिकाणी गाईचे दूध सांडताना दिसून आले. या गृहस्थाने गाईचे दूध सांडत आहे त्या ठिकाणी नीट निरखून साफसफाई करुन पाहिले तेव्हा उत्तर दिशेला असलेले शिवलिंग दिसून आले. त्यामुळे यापुढील काळात उतरेश्वर या नावने हे स्वयंभू शिवलिंग प्रसिध्द झाले.
आधुनिक काळात नवसाला पावणारे एक जागृत देवस्थान असा लौकीक या मंदिराने प्राप्त केला आहे. त्या त्या काळातील ग्रामस्थांनी येथे वर्गणी काढून मंदिराची स्थापना केली असून आगामी काळात येथे भव्य मंदिराचे ग्रामस्थांचे नियोजन आहे. उतरेश्वरांची त्रिपुरी पौर्णिमा व महाशिवरात्री उत्सव विशेष प्रसिध्द असून या निमित्ताने गावात तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गावातील सर्व जातीधर्माचे लोक या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. भजन, पुजन, धार्मिक कार्यक्रम, विविध गुणदर्शन, बाल, पुरुष, प्रौढ, महिलांच्या विविध कार्यक्रमांसह नाटक सादर करण्याची परंपरा ५० वर्षांपासून सुरु आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 08/Aug/2025












