मंडणगड : गुंज सामाजिक संस्था, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, तिडे आदिवासीवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक व खेळाचे साहित्य भेट देण्यात आले.
यासंदर्भात शाळेत नुकत्याच आयोजित कार्यक्रमात गुंज संस्थेचे मंडणगड तालुक्याचे प्रमुख विजय दुर्गवले व पदाधिकाऱ्यांनी या भेट वस्तू विद्यार्थ्यांना सुपूर्द केल्या.
यावेळी पर्यावरण पूरक साहित्यामध्ये कापडी बॅग व पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी कापडी बॅग देण्यात आली. वह्या,चित्रकला व कार्यानुभव या विषयासाठी साहित्य, इंग्रजी विषयासाठी वाचन साहित्य देण्यात आले.शैक्षणिक साहित्याबरोबरच मुलांना खेळाचा आनंद घेता यावा यासाठीही साहित्य देण्यात आले. यामध्ये क्रिकेट किट, बास्केट बॉल,बॅडमिंटनचे साहित्य, स्केटिंग साहित्य देण्यात आले. मुलांना बसण्यासाठी बस्कर पट्टया, ताडपत्री, टॅब हे साहित्य देण्यात आले आहेत. गेली तीन वर्षे संस्थेच्या वतीने या शाळेला मदत करण्यात आली आहे. यावेळी स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. कवितागायन, पाढे पाठांतर, चित्रकला तर काहींनी आपल्या नृत्यातून आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन केले .कार्यक्रमाला वाडीतील बहुसंख्य पालक उपस्थित होते.
यावेळी गुंज संस्थेचे विजय दुर्गवले यांनी आपल्या मनोगतात पर्यावरण रक्षण करण्यासाठी प्लास्टिकचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करावा, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अभ्यास करून शिक्षण आत्मसात करावे असे प्रतिपादन केले. यावेळी रोहित गायकवाड व अन्य मान्यवर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात स्वागत व सूत्रसंचलन मुख्याध्यापक निलेश लोखंडे यांनी केले तर आभार श्रीमती अस्मिता भरणे यांनी व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:17 08-08-2025












