बोगस डॉक्टरांना बसणार लगाम; रुग्णालयात क्यूआर कोड बंधनकारक

रत्नागिरी : बोगस डॉक्टर ओळखण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या माध्यमातून ‘नो युवर डॉक्टर’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. एमबीबीएस डॉक्टरांना क्यूआर कोड उपलब्ध करून दिला आहे. कोड स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरकीला आपसूकच चाप बसणार आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने ‘नो युवर डॉक्टर’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरला एक विशिष्ट क्यूआर कोड दिला जातो. तो स्कॅन केल्यावर त्या डॉक्टरची शैक्षणिक पात्रता, नोंदणी क्रमांक, क्लिनिकचा पत्ता व अनुभव अशा साऱ्या बाबी तपासता येतात.

नागरिकांनी उपचारासाठी जाताना डॉक्टरकडे क्यूआर कोड आहे का, याची खात्री करावी, यामुळे नागरिकांना डॉक्टरांची नोंदणी, पात्रता आणि परवाना यांची सविस्तर माहिती थेट मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांना आळा बसणार आहे.

तपास घ्यायचा कसा?
डॉक्टरने क्लिनिकमध्ये क्यूआर कोड लावलेला आहे का, हे पाहावे. क्यूआर कोड मोबाइलने स्कॅन करावा. स्कॅन केल्यावर डॉक्टरचे संपूर्ण तपशील उघडले पाहिजेत. माहिती उघड न झाल्यास किंवा चुकीचे तपशील आल्यास तत्काळ स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना कळवावे. त्यांच्यावर लगेच कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात किती फसवे डॉक्टर आहेत ?
जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात नेहमीच आरोग्य विभागाने कडक पावले उचलली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या तरी बोगस वैद्यकीय व्यवसाय करणारा एकही डॉक्टर सापडलेला नाही.

नो युवर डॉक्टर’ मोहीम नेमकी काय ?
नो युवर डॉक्टर मोहिमेअंतर्गत नोंदणीकृत डॉक्टरांना क्यूआर कोड दिला जातो. तो स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांविषयी माहिती रुग्णांना उपलब्ध होणार आहे. संबंधित डॉक्टर कोणत्या विषयामध्ये तज्ज्ञ आहे, याची माहिती मिळणार आहे

जिल्ह्यात ‘नो युवर डॉक्टर’ मोहिमेचे कार्य ?
इंडियन मेडिकल असोसिएशन, एमएमसी प्रतिनिधी आणि स्थानिक वैद्यकीय संघटनांच्या माध्यमातून या मोहिमेची माहिती दिली जाते आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 08/Aug/2025