मुंबई : राज्यात आता परतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सर्वसाधारण नैऋत्य मौसमी वारे १७ सप्टेंबरपासून माघारी फिरायला सुरुवात झाली आहे.
हे वारे यंदा २३ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू करू शकतील, अशी माहिती शुक्रवारी (२० सप्टेंबर) रोजी भारतीय हवामान विभागातर्फे प्रसिद्धपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम राजस्थान व कच्छ या भागातून नैऋत्य मौसमी वारे व पावसाच्या परतीसाठी अनुकूल वातावरण आहे.
२१ व २२ सप्टेंबर रोजी राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात आता आज (२१ सप्टेंबर) पासून काही दिवस पावसाचा मुक्काम असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात कोकण, गोवा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाड्यात ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांनी शेतातील जमा झालेले पाण्याचा निचरा करावा. तसेच वाटाणा, मक्का, सुर्यफुल, शेंगदाणा, सोयाबीन, भाजीपाला या पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.