‘शतसंवादिनी २.०’ मध्ये १०० हून अधिक कलाकारांची कला सादर होणार

रत्नागिरी : पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा लवकरच रत्नागिरीत पार पडणार आहे. ‘चैतन्यस्वर’ आणि ‘सहयोग रत्नागिरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने “शतसंवादिनी २.०” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहे.

गतवर्षी, २१ सप्टेंबर रोजी १०० हून अधिक वादकांनी एकत्र येत ‘शतसंवादिनी’ कार्यक्रम सादर केला होता, ज्याला रत्नागिरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याच यशानंतर यंदा ‘शतसंवादिनी २.०’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्येही १०० हून अधिक संवादिनी वादक आणि तालवाद्य साथीदार सहभागी होणार आहेत, जे संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.

कार्यक्रमाची संकल्पना ज्येष्ठ संवादिनीवादक आणि संगीतकार अनंत जोशी यांची आहे. त्यांनीच या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. या कार्यक्रमामध्ये रत्नागिरीमधील सर्व हार्मोनियम शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. गतवर्षी विविध रागांवर आधारित सिम्फनी सादर केल्या होत्या, तर यावर्षी सुप्रसिद्ध नाट्यगीतांवर आधारित हार्मोनियम सिम्फनी सादर केली जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी रसिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यापासून अवघ्या दोन दिवसांतच कार्यक्रम जवळजवळ ‘हाऊसफुल्ल’ झाला आहे. त्यामुळे अनेकांनी दुसऱ्या प्रयोगाची मागणी केली आहे. तिकीट विक्रीसाठी फारच कमी तिकिटे आता ‘its my show’ या वेबसाइटवर आणि नाट्यगृहावर उपलब्ध आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र येत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूर्वा पेठे करणार असून, तबला साथ आदित्य पानवलकर आणि प्रथमेश शहाणे हे देतील. इतर तालवाद्यांची साथ अद्वैत मोरे आणि राघव पटवर्धन यांची असेल. एस कुमार साऊंड सर्व्हिसेजचे उदयराज सावंत ध्वनी संयोजन पाहतील, तर ओम साई डेकोरेटर्सचे अमरेश सावंत नेत्रदीपक रंगमंच व्यवस्था करतील.

पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता या अविस्मरणीय संगीत सोहळ्याने होणार आहे, ज्यामुळे रत्नागिरीतील संगीतप्रेमींना एक अनोखी पर्वणी मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:27 08-08-2025