राजापूर : महसूल विभागामार्फत तालुक्यात दिनांक ०१ ते ०७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात आलेल्या महसूल सप्ताह २०२५ या उपक्रमांतर्गत महसुल प्रशासनाशी निगडीत विविध लोकाभिमुख कामांची पुर्तता करण्यात आली. या सप्ताहातंर्गत सन २०२५-२६ या महसुली वर्षामध्ये महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणेसाठी शासनाकडून प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणेबाबत आले. या अभियानांतर्गत विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड वितरीत करतानाच संजय गांधी निराधार व अन्य योजनांर्गत लाभ घेणाऱ्या वयोवृध्द व दिव्यांग लाभार्थीच्या घरी जाऊन त्यांच्या बँक खात्यांच्या केवायसी अपडेट करण्यात आल्या. तशी माहिती तहसीलदार विकास गंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी विशेष मोहिमव कार्यक्रम उपक्रम, शिबीर, महसूल अदालती यांचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील सर्व मंडळ अधीकारी स्तरावर प्रभावीपणे हे अभियान राबविण्यात आले.
या सप्ताहात महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार यांचा सन्मान करण्यात आला तर शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम राबिवण्यात आला.. पाणंद शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करण्यात आले. तर शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेणेची कार्यवाही करण्यात आली.
राजापूर तालुक्यात मंडळनिहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात आले. सदर शिबिरा करीता जातीचे प्रमाणपत्र, अधिवास, रहिवास, राष्ट्रीयत्व इ. दाखले विद्यार्थी यांना काढणेबाबत आवाहन करणेत आले होते. सदर शिबिरा दरम्यान 204 उत्पन्न, 33 अधिवास, 18 राष्ट्रीयत्व, 27 नॉनक्रिमिलेअर, 18 जातीचे प्रमाणपत्र, तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक 27 इतर दाखले यांचे वाटप करण्यात आले तसेच महसूली गावातील खातेदारांना 7/12, 8 अ तसेच फेरफार यांचे वाटप करण्यात आल्याचे गंबरे यांनी सांगितले.
राजापूर तालुक्यातील राजापूर, ओणी, हातिवले या मंडळात तहसीलदार विकास गंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर जैतापूर, कुंभवडे, कोंडये तर्फे सौंदळ या मंडळात निवासी नायब तहसीलदार विलास सरफरे, तर वाडापेठ, नाटे, भू, महसूल नायब तहसीलदार सायली गुरव, तसेच सौंदळ, तळवडे, पाचल या मंडळात निवडणूक नायब तहसीलदार मृणालीनी शेळके यांचे उपस्थित ही शिबिर पार पडली. यात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे गंबरे यांनी सांगितले.
मंडळ निहाय व गाव पातळीवर राबविण्यात आलेल्या या महसुल सप्ताहअंतर्गत विविध उपक्रमांत सर्व मंडळ अधिकारी, गावचे सरपंच, शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, ग्राममहसुल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक तसेच लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी यांनी उपस्थिती लावली व मोलाचे सहकार्य केले.
केवळ सप्ताहापुरतेच नाही तर कायमच महसुल प्रशासनाचे काम अधिक गतीमान व लोकाभिमुख करण्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याने आंम्ही प्रयत्न करणार असल्याचे गंबरे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:52 PM 08/Aug/2025












