दापोली : चिखलगाव येथे यांत्रिकी शेती व विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानावर मार्गदर्शन

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषीविद्यापीठ, दापोली अंतर्गत चिखलगावात कार्यरत असलेल्या रावेच्या सह्याद्री व नित्या गटाच्या कृषीकन्यांनी यांत्रिक शेतीचे महत्त्व आणि विद्यापीठ तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार या विषयांवर एक व्यापक असे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले.

सदर शिबीराचे आयोजन चिखलगावातील गणेशमंदिरमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शन डॉ. सचिन पाठक व डॉ. प्रविण झगडे हे होते.

यांत्रिक शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता करणे व विद्यापीठ तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे या हेतूने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रोजेक्टर च्या साहाय्याने डॉ. प्रविण झगडे व डॉ. सचिन पाठक सर यांनी शेतकऱ्यांना माहितीचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. कु. श्रद्धा सावंत आणि कु. काजल मोहिते यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

डॉ. सचिन पाठक यांनी विविध शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणांची माहिती दिली. शेतकऱ्यांना नव नवीन यंत्र प्रत्यक्षात दाखवण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पंकज पडलर, 7-रो ट्रान्सप्लँटर, 8-रो ट्रान्स प्लँटर, नूतन मँगो हार्वेस्टर, अमर लॉरेनथस कटर, काजू कटर, सुपारी काढणे यंत्र, इत्यादी यांचा समावेश होता. या यंत्रांची माहिती देताना यंत्र वापरताना घ्यावयाची काळजी, अंतर, वापरायची पध्दत, विशिष्ट आवश्यकता, मर्यादा यांबाबत मार्गदर्शन केले.

गावकऱ्यांमध्ये सुपारी उत्पादनात आधिक रूचि दिसुन आल्यामुळे या मुद्द्यावर जास्त चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित सुपारींच्या जातींचा माहिती देण्यात आली. तसेच योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांना अधिक माहिती मिळावी यासाठी त्यांना विविध माहितीपूर्ण व्हिडिओस दाखवण्यात आले, ज्यामध्ये नव नवीन उपकरणे कसे वापरावेत हे स्पष्ट झाले. डॉ. प्रविण झगडे यांनी कृषी विद्यापीठाबद्दल माहिती सांगितली. तसेच कृषी शिक्षणाबद्दल शेतकऱ्यांना महत्त्व पटवून दिले. त्यांनी कृषी व्यवसाय कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. ते करत असताना सकारात्मक वृत्ती, नावीन्यता, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, जोखीम उचलण्याची ताकद यांची भूमिका पटवून दिली. तसेच शेतकऱ्यांना विविध योजनांबद्दल माहिती सांगितली.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. शेतकऱ्यांना पडलेल्या विविध प्रश्नाचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली. स्थानिक मार्गदर्शक म्हणून गाव अध्यक्ष राजेश शिगवण, सचिव योगेश रामाणे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच डॉ. सचिन पाठक व डॉ. प्रविण झगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचा शेवट गावच्या अध्यक्ष व सचिव यांच्या आभार प्रदर्शनाने झाले. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना यांत्रिक शेतीचे महत्त्व व गरज समजली. डॉ. प्रविण झगडे यांचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात मोलाचे योगदान ठरले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:57 PM 08/Aug/2025