रत्नागिरी : तब्बल ४० वर्षांच्या गौरवशाली परंपरेचे पुनरुज्जीवन करत, श्री. राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी आणि रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय खुल्या गट कबड्डी स्पर्धेची नुकतीच सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या या मॅटवरील थरारक स्पर्धेत १८ संघांनी सहभाग घेतला होता. संस्थेच्या १०० व्या वर्षानिमित्त पुन्हा एकदा ही कबड्डीची परंपरा सुरू करण्यात आली, ज्यामुळे रत्नागिरीतील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. उद्घाटन सामना कालिका मिरजोळे आणि शिवनेरी शिळ या संघांमध्ये झाला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.
स्पर्धेच्या अंतिम दिवशी दोन उपांत्य आणि एक अंतिम सामना पार पडला, ज्यामध्ये क्रीडा रसिकांनी तुफान गर्दी केली होती. पहिला उपांत्य फेरीचा सामना महापुरुष पोलीस, रत्नागिरी आणि कालिका मिरजोळे यांच्यात झाला. या अत्यंत चुरशीच्या सामन्यात महापुरुष पोलीस संघाने कालिका संघावर मात करत अंतिम फेरीत धडक मारली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात डॉ. नानासाहेब मयेकर फाऊंडेशन, मालगुंड संघाने दर्यासागर गावखडी संघाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामना महापुरुष पोलीस, रत्नागिरी आणि डॉ. नानासाहेब मयेकर फाऊंडेशन, मालगुंड यांच्यात झाला. हा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. दोन्ही संघांनी विजयासाठी सर्वस्व पणाला लावले, पण शेवटी महापुरुष पोलीस संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. डॉ. नानासाहेब मयेकर फाऊंडेशन, मालगुंड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत तिसरे स्थान कालिका मिरजोळे संघाने पटकावले, तर दर्यासागर गावखडी संघ चौथ्या क्रमांकावर राहिला.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रसाद वाडकर यांनी निरीक्षक म्हणून तर संतोष किर यांनी पंच प्रमुख म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना आकर्षक चषके आणि बक्षिसे प्रदान करण्यात आली. या स्पर्धेमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि रत्नागिरीतील कबड्डीला पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याचे दिसून आले. पुढील वर्षीही अशीच स्पर्धा आयोजित केली जाईल, अशी आशा क्रीडा रसिकांनी व्यक्त केली. रत्नागिरी खबरदारच्या वतीने या अंतिम सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.













