देवरूख : राधा-गोविंद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा येथे पार पडला.
यावेळी संगमेश्वर तालुक्यातील ३५ गावांतील बचतगटांमधील १४० महिला उपस्थित होत्या. राधा-गोविंद फाऊंडेशनचे प्रमुख पूजा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सई निकम यांनी फाऊंडेशनकडून आतापर्यंत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.
या मेळाव्यात अॅड. सीमा गिड्ये यांनी महिलांना सुरक्षाविषयी शासनाने केलेला कायदा या विषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर एसबीआयचे मॅनेजर निखिल भिडे यांनी मार्गदर्शन करताना बँकेच्या देवरुख शाखेतून गेल्या ६ महिन्यांत ६ कोटी रुपये कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले.
यानंतर संगमेश्वर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भरत चौगले यांनी मार्गदर्शन करताना संगमेश्वर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य योजना, लेक लाडकी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा मातृ वंदना योजना, सर्व प्रवर्गातील मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आदी योजनेविषयी उपस्थितांना माहिती दिली.
जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी उद्योग निरीक्षक रवींद्र सूर्यवंशी यांनी जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या योजनेविषयी मार्गदर्शन करत योजनेची पात्रता व निकष समजावून सांगितले. तसेच सभागृहातील महिलांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. होम मिनिस्टर कार्यक्रमही उत्साहात पार पडला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 18/Oct/2024














