रत्नागिरी : ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने जांभारीतील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच आदेश पावरी यांना पंचायत समितीमध्ये या टेबलावरून त्या टेबलावर पाण्याची व्यथा मांडत फिरावे लागत आहे. मात्र, जांभारी गावातील टाकीपर्यंत उच्च दाबाने पाणी का पोचत नाही, यावर तोडगा काढण्यात अपयश आले आहे.
अधिकऱ्यांना तालुक्याच्या एका बाजूला खाडीकिनारी वसलेल्या जांभारी गावाला २८ जुलैपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. वीजपुरवठा खंडित झाल्याचे निमित्त घडले आणि त्या दिवसापासून जुन्या पाईपलाईनला अपेक्षित दाबाने पाणी येणेच बंद झाले. याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पालकमंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत गाऱ्हाणे मांडले गेले. पण जांभारीवासीयांचा प्रश्न अजूनही आहे तसाच आहे. शेवटी संतापलेल्या महिलांनी जांभारी येथील ग्रामपंचायत कार्यालय गाठले. गटविकास अधिकाऱ्यांना भेटायला सरपंच आदेश पावरी हे पंचायत समितीत आले होते.
महिला ग्रामपंचायतीवर धडकल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पावरी यांनी उपसरपंच मंगेश पावरी यांना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले. उपसरपंचांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजावून सांगितले. त्यावर महिलांनीही आमचा पाणीप्रश्न तातडीने सोडवा, आम्हाला आर्थिक भुर्दंड बसत आहे, असे ठणकावून सांगितले.
जांभारी गावची लोकसंख्या साडेतीन हजार असून, गावामध्ये पाणीपुरवठ्यासाठी मोठी टाकी उभारण्यात आली आहे. सध्या पाणीच कमी दाबाने येत असल्याने ती टाकी फक्त ४ फूटच भरते. आठ फूट टाकी भरली की, अर्ध्या गावाला पाणी पुरते. त्यामुळे सध्या या गावात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. नवीन योजनेतून पाणीपुरवठा करण्यासाठी टाकी उभारण्यात आली असली तरी ती योजना अर्धवटच आहे.
गावाला पाणी पुरवणार्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली असून, लिकेज काढण्यात आले आहेत, असे पंचायत समितीच्या पाणी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच गटविकास अधिकाऱ्यांनीही हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन सरपंचांना दिले आहे.
जुन्या पाईपलाईनमधून पाणी व्यवस्थित येत नसेल, तर सैतवडे येथून जांभारीपर्यंत नवीन टाकलेल्या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली आहे- आदेश पावरी, सरपंच, जांभारी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:57 AM 09/Aug/2025












