लांजा : लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली असून दोन दिवसांपूर्वी तालुका प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्ग ठेकेदार विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लांजा शहरात खड्डे भरण्याची प्रक्रिया हाती घेण्यात झाली आहे.
लांजा शहराच्या मध्यातून गेलेल्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या अर्धवट स्थितीत असलेल्या चौपदरीकरण कामाने ऐन पावसात लांजा शहरात दाणादाण उडवली होती. पावसाचे पाणी महामार्गावर तर शेजारील घरांमध्ये शिरले होते. पाऊस सुरू राहिल्यास शहरात महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते आहे. याचा त्रास नागरिक, व्यापारी व वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. या अर्धवट कामाबाबत सर्वच स्तरातून आवाज उठल्याने अखेर महामार्ग ठेकेदार यांनी लांजा शहरात महामार्गावर पडलेले खड्डे खडी व मातीच्या सहाय्याने तात्पुरते भरले होते. तर सर्व्हिस रोड अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे शहरात अर्धवट कामाचा व सुरक्षित रस्ता नसल्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
पावसाचे प्रमाण कमी झाले असून सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. मात्र शहरातून गेलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. महामार्गावर लांजा शहरात ठराविक अंतरांवर मोठे खड्डे पडले असून चिखल माती पसरलेली आहे. येत्या गणेशोत्सवात महामार्ग खड्डे व चिखलयुक्त राहू नये व नागरिक, वाहनचालकांना ऐन सणामध्ये त्रास होऊ नये यासाठी लांजा तालुका प्रशासन सतर्क झाले आहे. महामार्ग विभागाला खड्डे भरण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरात पडलेले खड्डे खडी व डांबराने भरण्याची प्रक्रिया महामार्ग ठेकेदारांकडून सुरू झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात लांजा शहरात नागरिक, भक्त गण, वाहनचालकांना तूर्तास खड्यांपासून मुक्ती मिळेल अशी अपेक्षा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:16 AM 09/Aug/2025














