रत्नागिरी : येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खून प्रकरणात एकपेक्षा अधिक संशयितांचा सहभाग असण्याची श्यक्यता असून खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल ५ पथके तैनात केली आहेत. त्यापैकी एक पथक स्थानिक पातळीवर कार्यरत ठेवण्यात आले असून अन्य ४ पथके मारेकऱ्यांच्या मागावर आहेत.
विशेष म्हणजे मारेकऱ्यांनी वर्षा जोशी यांच्या कॅम्प्युटर मधील हार्डडिस्क देखील काडून नेली आहे. त्यामुळे मारेकऱ्यांनी पूर्ण प्लॅन करून ही हत्या केली असल्याचा संशय असून मारेकरी माहीतगार असण्याचीही श्यक्यता आहे. पोलिसांनी मात्र चारही बाजूने वेगवान तपास सुरू केला आहे.
चिपळूण शहरापासून जवळच असलेल्या धामनवणे खोतवाडी येथे राहणाऱ्या निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी ६३ वर्षीय विधवा महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून काही बाबी समोर आल्या आहेत. मयतच्या शरीरावर असलेल्या किरकोळ जखमा या प्रतिकार व झटापटीच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच श्वास कोंडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे देखील शवविच्छेदनातुन स्पष्ट झाले आहे.
दरम्यान मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचे देखील समोर आले आहे. येथील सीसीटीव्हीचा मुख्य व्हीडीआर गायब आहे.तसेच मयतचा मोबाईल पाण्याच्या बादलीत फेकून दिलेला होता आणि आता मयतच्या संगणकाचे हार्डडिस्क गायब असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे मारेकऱ्यांनी रेखी करून पूर्ण प्लॅन तयार करून ही हत्या केली असल्याचा पोलिसांना संशय आहे.तसेच मारेकरी माहितगार व एकापेक्षा जास्त असावेत या निकषापर्यंत पोलीस आले आहेत. ज्या एका व्यक्तीला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते,त्याची चौकशी पूर्ण करून त्याला सोडून देण्यात आलेले आहे.त्यामुळे पोलिसांनी आपला तपास आता अन्य मार्गाने सुरू केला आहे.अप्पर पोलीस अधीक्षक महामुनीम चिपळूणमध्ये ठाणमांडून आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची ५ पथके तयार करण्यात आली असून एक पथक स्थानिक पातळीवर कार्यरत ठेवण्यात आले आहे तर अन्य ४ पथके अन्यठिकाणी पाठवण्यात आली आहेत.पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यामाध्यमातून देखील काही संशयित हालचाली हाती लागण्याची श्यक्यता आहे.परंतु खून नेमका कोणत्या कारणास्तव झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मयत वर्षा जोशी या एकट्याच घरात राहत होत्या त्यामुळे घरातून कोणते आणि किती सामान चोरीला गेले किंवा कसे याचा उलगडा होत नसल्याने खून नेमका कोणत्या उद्देशाने झाला हे संशयित ताब्यात आल्यानंतरच समजणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:25 AM 09/Aug/2025














