दापोली : ‘सण आयलाय गो, आयलाय गो, नारली पुनवेचा ! मनी आनंद मावना कोळ्यांच्या दुनियेचा’, या गाण्यांच्या तालावर हर्णे बंदरात नारळी पौर्णिमेनिमित्त जल्लोषाचा माहोल रंगला. कोळी समाजाच्या परंपरेतील सर्वात मोठा आणि उत्साहवर्धक सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी, विविध संघटनांच्या सहभागातून पारंपरिक मिरवणुका, सजवलेल्या होड्या आणि सोन्याचा नारळ अर्पण करण्याचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीनंतर कोळीवाड्यांमध्ये नवचैतन्य आणणाऱ्या या सणासाठी हर्णे व पाजपंढरी येथील मिरवणुकीत होड्यांना देखण्या सजावटीने सजवण्यात आले. त्यातील मुख्य आकर्षण म्हणजे मोठा सोनेरी रंगाने मढवलेला नारळ, जो दर्यादेवतेस अर्पण करण्यात आला. हर्णे समता चालक मालक रिक्षा संघटना, व्यापारी मित्र मंडळ, संपूर्ण कोळीवाडा संघटना, फत्तेगड ग्रामस्थ मंडळ यांसह अनेक संघटनांनी दणक्यात मिरवणुका काढल्या. पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशांच्या तालावर थिरकणारे पाय, आणि डीजेच्या आवाजाने बंदर परिसर दणाणून गेला.
पारंपरिक वेशभूषा आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजलेल्या कोळी महिला, तसेच आबालवृद्धांसह लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी पाहायला मिळाला. या कार्यक्रमात राज्यमंत्री योगेश कदम, हर्णे ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य, दापोली तहसीलदार, प्रांताधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, तसेच दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश तोरस्कर व त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम चोख पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडला.
समुद्रकिनारी विधिवत पूजा करून सोन्याचा नारळ दयदिवतेस अर्पण करताना कोळी बांधवांच्या चेहऱ्यावर अपार उत्साह दिसत होता. गर्दीन फुललेल्या हर्णे जेटीवर ‘आमच्या बांधवांचे रक्षण कर’ अशी साद दर्यादेवतेस घालण्यात आली. आगामी मासेमारी हंगाम समृद्ध होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:42 AM 09/Aug/2025












